यशवंत शिक्षण संस्था ,सुरूर 

       सुमारे पंचवीस वर्षापूर्वी सुरु झालेल्या व वर्षी रोप्यमोत्सवी वर्ष पूर्ण करीत असलेल्या आमच्या  यशवंत  शिक्षण संस्थेच्या रम्य भूतकाळाचा मागोवा घेताना अतिशय आनंद होत आहे. सध्याच्या काळात  शिक्षणाचा प्रसार व विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे.  सध्याच्या काळात अनेक गोष्टी अनुकूल असल्याने एखादी शाळा किंवा शैक्षणिक संस्था सुरू करणे फारसे कठीण नाही. परंतु  अत्यंत  प्रतिकूल अशा परीस्थितीत व काहीही अर्थिक पाठबळ  नसताना 50 वर्षापूर्वी यशवंत शिक्षण संस्थेचे सुरुर हायस्कूल स्थापन झाले. एवढेच नव्हे तर अत्यंत उत्तम व दर्जेदार शिक्षण देऊन असंख्य विद्यार्थ्यांचा आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबांचा व खेडयांचा विकास करण्याचे मोलाचे कार्य संस्थेने केलेले दिसून येते.

       तत्पूर्वी या भागात माध्यमिक शाळा नसल्याने असंख्य विद्यार्थ्यांचे सातवीपर्यंत शिक्षण होत असे ज्यांच्या घरची परिस्थिती बर्‍यापैकी होती, अशा अगदी थोडया मुलांना वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेता येत असे. बहुसंख्य विद्यार्थी सोय नसल्यामुळे माध्यमिक शिक्षणापासून वंचित होत होते. अशा परिस्थितीत कै. किसनवीर व कै. विठ्ठ्लराव जगताप यांनी या परिसरातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन हे  छोटेसे रोपटे सुरुर येथे लावले. श्री बाबा चिटणीस यांनी मुख्याध्यापक व पुढे संस्थेचे सेक्रेटरी म्हणून कै. आबा व अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचा विकास करण्याचे अथक प्रयत्न केले. सुरुवातीच्या काळात अत्यंत लायक व निष्ठावान शिक्षकांनी या संस्थेच्या उभारणीस यथाशक्ती हातभार लावला.

       संस्था नुकतीच सुरु झाल्यानंतर म्हणजे १९६१ ते १९६५ या काळात शाळेला स्वतंत्र अशी इमारत नव्हती. सुरुर येथील आठवड्याच्या बाजाराच्या ठिकाणाला लागुन असलेल्या अगदी छोटयाशा बैठया इमारतीत ८ ते११ वी चे वर्ग भरत असत  त्या वेळी संपुर्ण पंचकोशीत सुरुरची एकमेव  शाळा  असल्याने सुरुर, केंजळ, कवठे,चांदक, वेळे व  आसपासच्या वाड्यातून येथे मुले शिक्षणासाठी येत असत. ज्या गरीब व अशिक्षित पालकांना आपली मुले माध्यमिक शिक्षणासाठी पाठविणे शक्य नव्हते, अशांना या संस्थेमुळे मोठा दिलासा मिळाला व आपल्या मुलांना किमान माध्यमिक शिक्षण मिळेल म्हणुन अतिशय आनंद झाला. त्या वेळी सातवीपर्यंतचे शिक्षण हेच ग्रामीण भागात जास्त मानले जात असल्यामुळे बरेच पालक  माध्यामिक शाळेत मुलींना पाठवत नसत. त्यामुळे सुरुवातीला फारच थोडे विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेत. त्यांपैकी बरेचसे अगदी गरिब कुटुंबातील असल्याने  आपल्या गावापासून १ ते ४ कि. मी अंतर  अनवाणी  चालत येत असत. कित्येकांना दुपारचे जेवणही बरोबर  आणणे शक्य होत नसे . मुलांना शाळेचा वेळ सोडल्यास अभ्यासास क्वचितच वेळ मिळे. अभ्यासाचे वातावरण नसल्याने व सकाळ – संध्याकाळ  शेता वरची कामे करावी लागत असल्याने अभ्यासाची खूपच कुचंबणा होत असे. परंतु  तशा परिस्थितीत शिक्षणाच्या माध्यमातुन अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट शिक्षण देण्याचे व त्यांच्या जीवनास योग्य दिशा देण्याचे मोलाचे काम संस्थेने केले.

       संस्थेला सुरवातीपासूनच योग्य व कार्यक्षम नेतृत्व लाभल्याने आज संस्थारुपी वटवृक्षाच्या शाखा दूरवर पसरलेल्या पाहावयास मिळतात. सुरवातीला संस्थेचे सुरूर येथे एकच हायस्कूल होते. आज केंजळ, गुळुंब, वाई, उडतरे, शिवथर येथे या संस्थेच्या शाखा असून सुमारे 3500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 5 वी ते 10 वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण मिळण्याची सुवर्णसंधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. गावातच शाळा झाल्यामुळे केवळ शाळेत जाणार्‍या मुलांचीच नव्हे तर मुलींचीही संख्या वाढलेली आहे. मुलींना शिक्षणासाठी परगावी पाठवण्यास अनेक पालक पूर्वी तयार नसत. परंतु या भागातील जवळजवळ प्रत्येक गावात माध्यमिक शाळा संस्थेने सुरू केल्यामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण आज खूपच वाढलेले दिसते.   


       या परिसरातील ग्रामीण जनतेच्या आशा‌‌- आकांक्षाचे प्रतीक बनलेल्या या संस्थेने शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांचे जीवन समृध्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संस्थेच्या शाळांतून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयात उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहेत. या संस्थेत शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी समाजामध्ये चमकताना दिसतात. शिक्षक, प्राध्यापक,इंजिनियर व वकील अशा विविध क्षेत्रात ते यथाशक्ती काम करीत असल्याचे दिसते. अनेकजण बॅंका, सरकारी कार्यालये व खाजगी कंपन्यांमध्ये चांग्ल्या हुद्द्यांवर काम करीत आहेत.

       शिक्षणामुळे केवळ शिक्षण घेणार्‍याचाच फायदा होतो असे नव्हे तर त्याच्या कुटुंबाचा व गावाचाही फायदा होतो. या संस्थेतून शिक्षण घेतलेले असंख्य विद्यार्थी शैक्षणिक व आर्थिक दृष्टीने स्वावलंबी व समृध्द झाल्याने त्यांचा कुटुंबांना व इतरांना दिलासा मिळालेला आहे. समाजजीवन स्त्रीशिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे. जेव्हा एखादी स्त्री सुशिक्षित होते, तेव्हा तिचे सर्व कुटुंब सुशिक्षित होण्यास मदत होते. त्या दृष्टीने संस्थेचे कार्य मोलाचे आहे. या भागातील शिक्षणाच्या प्रसारामुळे जुन्या परंपरांना व अंधश्रध्दांना फाटा देऊन विज्ञानवादी दृष्टिकोण अंगीकारण्याचे धैर्य तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अशा रीतीने ग्रामीण भागात शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न ही संस्था करीत आहे.