रोशनी-द लाईट ऑफ साऊथ एशिया या अमेरिकेत प्रकशित झालेल्या मासिकामध्ये वाईच्या एका मराठी शास्त्रज्ञाचा परिचय आला आहे.या शास्त्रज्ञाचे नाव डॉ.अशोक जोशी.त्यांचे यश व त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनुकरणीय आहे. या दोन गोष्टी त्यांचे साधेपण व सुसंस्कृत जीवन उलगडून दाखवितात.अफाट कर्तृत्वाबरोबरच दातृत्व असलेली ही महान व्यक्ती आपल्या मातीला व मातेला विसराली नाही. केंजळ सारख्या छोट्या गावी आपल्या मातेच्या स्मरणार्थ कमलाबाई जोशी केंजळ विद्यालयास ७ लाख रुपयाची देणगी नुकतीच दिलेली आहे. प्रसिध्दी माध्यमातून दूर राहणारे, संकोची स्वभावाचे डॉ. अशोक यांनी त्यांच्या अचूक निर्णय क्षमतेच्या जोरावर अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे.निश्चित दिशा व अथक प्रयत्न यातच त्यांचे यश व असामान्यत्व सामावलेले आहे. डॉ.अशोक यांचे वाईशी नाते जवळचे व जिव्हाळ्याचे आहे. त्यांचे बालपण वाईतच गेले.वाईच्या द्रविड हायस्कूलचे ते विद्यार्थी. प्रसिध्द विचारवंत तर्कतीर्थ श्री.लक्ष्मणशात्री जोशी त्यांचे काका व प्रसिध्द आयुर्वेदाचार्य श्री. वेणीमाधवशास्त्री जोशी त्यांचे वडील. त्यांच्या घरात स्वातंत्र्य संग्रामातील मोठ्या व्यक्तिंची नेहमीच वर्दळ असायची त्यामुळे डॉ.अशोक यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक थोर व्यक्तिंशी संपर्क आला आहे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून मटेरिअल सायन्स या विषयात डॉक्टरेट मिळवल्यानंतर डॉ. अशोक यांनी सॉल्ट लेक सिटी येथील सेरेमॅटीक कंपनीमध्ये शास्त्रज्ञ म्हणून प्रवेश केला. इलेक्ट्रोकेमिस्ट्री व अॅडव्हान्स मटेरिअल्स या क्षेत्रात संशोधन करणार्या कंपनीमध्ये त्यांनी अनेक वर्षे शास्त्रज्ञ व उद्योजक म्हणून काम केले आणि अथक प्रयत्न व असामान्य निष्ठा या गुणांच्या जोरावर त्यांनी ही कंपनी विकत घेतली व त्या कंपनीचे ते अध्यक्ष व प्रमुख कार्याध्यक्ष बनले. निष्ठा आणि दूरदृष्टी या गुणांच्या जोरावर त्यांनी आपल्या कंपनीसाठी महत्त्वकांक्षी योजना राबविल्या.त्यामुळे या कंपनीची झपाट्याने वाढ झाली. आज या कंपनीमधील एक तृतीयांश कर्मचारी विज्ञान व अभियांत्रिकी शाखामधील उच्चविद्याभूषित शास्त्रज्ञ आहेत. सेरॅमिक मटेरिअल्सचे संशोधन व वाढ या संदर्भातील एक आंतरराष्ट्रीय किर्तीची संस्था म्हणून डॉ. जोशी यांच्या कंपनीचा लौकीक आहे. डॉ. अशोक हे एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व आहे. पत्नी,मुले व आपण या सर्वांमधील प्रेमसंबंध हे डॉ.अशोक जोशी जीवनाचे आधार मानतात. म.गांधी त्यांचे प्रेरणास्थान आहेत आणि लहान मुलांना त्यांचे अनुभव विश्व संपन्न करण्याचे स्वातंत्र्य व संधी आपण दिली पाहिजे ही त्यांची धारणा आहे. वाईशी नाते असलेले हे विद्वान,संशोधक व उद्योजक आपल्या दिवसाची सुरुवात खालील प्रार्थनेने करतात. “माझा अहंकार माझ्या मार्गात अडसर ठरु नये’’ या प्रार्थनेतच डॉ.अशोक जोशी यांचे मोठेपण व कर्तृत्व सामावलेले आहे.
विशेष म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या ऊर्जाविषयक आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.जोशी यांनी अणुशक्तीचा वापर करून पण्यापासून हायड्रोजनचे विघटन करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यांची सेरेमॅटीक ही कंपनी अमेरिकेतील ५० महत्त्वाच्या कंपन्यामधील एक महत्त्वाची कंपनी समजली जाते. डॉ. अशोक यांच्या नावावर ६० वस्तूंच्या निर्मितीचे हक्क (patents) आहेत.