Menu:

कमलाबाई जोशी केंजळ विद्यालय, केंजळ 

kenjal

 

         केंजळ हे दक्षिण काशी वाई तालुक्याच्या पूर्वेस १० कि.मी. अंतरावर वसलेले टुमदार गाव. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३८ साली गावात प्राथमिक शिक्षणाची सोय झाली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले की, गावातील मुलाना केंजळ पासुन ५कि.मी. अंतरावरील श्री शिवजी विद्यालय,सुरूर या ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी चालत जावे लागत असे. त्यामुळे गावातील जुन्या जाणत्या मंडळीनी कै.किसनवीर आबा,कै.बाबुराव चव्हाण,श्री.बाबा चिटणीस यांच्याशी चर्चा करुन केंजळ गावात हायस्कूल सुरु करण्याचे ठरवले.
                 यशवंत कीर्तिवंत,विद्यावंत कलावंत
                कुलवंत सुचिष्मंत,विद्या तो भाग्यवंत

        हे ब्रीद असलेल्या यशवंत शिक्षण संस्थेचे विद्यालय केंजळ गावात सुरु झाले. शाळेसाठी इमारतीचा प्रश्न होताच. मग सर्वानी गावात असलेली हनुमान व्यायामशाळा हायस्कूल साठी देण्याची तयारी दर्शवली.
        1 मार्च 1970 ला इ. 8 वी साठी श्री शिवजी विद्यालय,सुरुर येथुन 91 विद्यार्थ्यांची नोंदणी केली गेली. मुख्याध्यापक म्हणून कै.द.म.देवधर यानी कार्यभार स्विकारला. सह शिक्षक म्हणून कै.विनायकराव जाधव,कै.विजया देशपांडे यांची नेमणूक झाली. तर लेखनिक म्हणून श्री.डी.डी.गुरव यानी कार्यभार संभाळला. जून 1973 ला इ. 5 वी हायस्कूलला जोडण्यात आली. एकूण 45 विद्यार्थी दाखल झाले. जसजशी विद्यार्थी संख्या वाढू लागली तसतशी इमारत अपुरी पडू लागली. ग्रामस्थानी श्रमदानाने भैरवनाथ मंदिरालगत चार खोल्या बांधल्या.
        आनंद्पूर,चांदक,कोचळेवाडी व केंजळ येथून मुले शिक्षणासाठी येवू लागली. संस्थेच्या मालकीची इमारत असावी या हेतूने तत्कालीन मुख्याध्यापिका सौ.काकडे मॅडम यानी प्रयत्नय सुरु केले. यातुनच अमेरिकस्थित परंतु मुळचे केंजळचे सुपुत्र श्री.मुरलीधरपंत कुलकर्णी यांच्याशी संपर्क झाला. श्री.सुनिल जगताप , श्री.मयुर व्होरा , श्री.उत्तमराव जोशी , श्री.सुभाष कुलकर्णी यांच्या  मदतीने इमारतीच्या पाया भरणीचा शुभारंभ झाला. अजिंक्य मंडळ केंजळ यानी एक संगणक कक्ष बांधुन दिला.
        विद्यार्थ्याना सगणक शिक्षण देण्याची गरज व अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव यामुळे विद्यालयास संगणक कक्ष बांधण्याची आवश्यकता निर्माण झाली. 1997 साली प्रा. वसंतराव जगताप ,  श्री.सुनिल जगताप , अजिंक्य मंडळ केंजळ , मॅप्रोचे मा.मयुरशेठ व्होरा या सर्वांच्या सहकार्याने संगणक कक्षासह चार खोल्या पूर्ण करण्यात आल्या.
        मूळचे केंजळचे व सध्या सॉल्ट लेक सिटी , अमेरिका येथे स्थायिक असलेल्या श्री.मुरलीधरपंत कुलकर्णी यानी पाठविलेले 45,000 रुपये , सन 2004 च्या स्नेहसम्मेलनाचे अध्यक्ष श्री.उत्तमराव जोशी यानी दिलेले 55,000 रुपये , अमेरिकेतील श्री. सुभाष कुलकर्णी यानी शाळेची प्रगती पहून 6 लाख रुपयांची दिलेली देणगी यामुळेच हे सर्व बांधकाम करणे सोपे झाले.
        तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे पुतणे व जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. श्री. अशोक जोशी यानी   6 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे. त्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ या विद्यालयाचे नाव कमलाबाई जोशी विद्यालय केंजळ असे करण्यात आले आहे. केंजळ चे कॉन्ट्रॅक्टर श्री. मुकुंद जगताप यानी या ईमारतीचे बांधकाम कमी वेळेत व सुबकपणे केले.

शालेय सुविधा-

        विद्यमान अभ्यासू व तरुण तडफदार संचालक मंडळ आणि मार्गदर्शक व संस्था सचिव अ‍ॅड. अरविंद चव्हाण हे शालेय सुविधेकडे जणिवपूर्वक लक्ष देतात. त्यामुळे विद्यालय सर्व भौतिक बाबीत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे सुसज्ज दुमजली इमारत , भव्य क्रिडांगण , सुसज्ज सभाग्रह , परिपुर्ण प्रयोगशाळा , विविध विषय खोल्या इत्यादिनी विद्यालय सुसज्ज आहे.

        संस्था संचालक , संस्था सचिव , ग्रामस्थ , शिक्षक
        शिक्षकेतर कर्मचारी ,सेवानिव्रुत्त कर्मचारी , मार्गदर्शक
        या सर्वांच्या सहकार्याने यशवंत शिक्षण संस्थेचे हे
        विद्यालय सामाजिक संस्करणासाठी अविरत कटिबद्ध आहे.